उकाडा खूपच वाढायला लागलाय. अगदी पहाटे उठून जंगलात गेलात, तरच ठीक. साडेसात वाजून गेले कि ऊन तापायला लागलंय. आपल्याकडच्या जंगलात ऊन अधिकच जाणवतं. कारण आपल्याकडे पानझडी प्रकारचं जंगल आहे. आपल्याकडे आढळणारी सगळी प्रमुख झाडं, जसं कि काटेसावर, पळस, पांगारा, मोह, शिवण, हळदू, बहावा, हुंब, शिसम, कुम्भा, कौशी, बेहेडा, काळा कुडा, वावळ, बीजा, इ. हि सगळीच हिवाळ्यात पानं गाळणारी. वसंत ऋतूचं आगमन झालं असलं, तरी अजून यांच्यापैकी अनेकांवर पानं नाहीत. त्यामुळे ऊन जंगलात लगेच शिरतं.
आता याच दिवसांत याच जंगलात एखाद्या ओढ्याच्या पात्रात गेलात, भले तो कोरडा ठणठणीत का असेना, तर गार सावलीमुळे लगेच बरं वाटतं. असं का बरं? या ओढ्याला पावसाळ्यात धोधो पाणी असतं. आपल्याकडे नदी, ओढे, झरे यांच्या काठावर आढळणारी खास झाडं आहेत. यांना रायपेरीयन झोनमधली झाडं म्हणतात. तामण, नेवर, करंज, जांभूळच्या अनेक प्रजाती, अर्जुन, उंबर, वाळूंज, कदंब हि खास ओढ्याच्या, नदीच्या काठाने वाढणारी झाडं. ही झाडं पाणी धरून ठेवतात. येऊरच्या जंगलात ओढ्यांच्या काठी करंज, जांभूळ, उंबर आहेत. हि सगळीच सदाहरित झाडं. त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहाच्या काठांवर नेहमी सावली असते. अगदी भर उन्हाळ्यातसुद्धा. आणि त्यामुळे आपल्याला गार, बरं वाटतं. याच आपल्या जंगलात आंब्याची खूप मोठमोठी झाडं आहेत. हिसुद्धा सदाहरित. आंब्याच्या घनगर्द सावलीत किती बरं वाटतं. तात्पर्य काय, तर शहरातसुद्धा वाढत्या उष्णतेला तोंड देण्याकरिता आपण सदाहरित प्रकारची देशी झाडं लावायला हवीत. येत्या पावसाळ्यात आपल्या सोसायटीच्या आवारात आंबा, जांभूळ, करंज, चिंच, सीता अशोक, बकुळ, खिरणी, उंडी, सुरंगी, उंबर, चिकू यांच्यापैकी काही झाडं लावण्याचा प्रयत्न करूया.
येऊरमध्ये सध्या कौशी आणि कुम्भा जोरदार फुललेत. पायवाटेवरून चालताना कौशीच्या मखमली केशरी फुलांचा आणि करंजाच्या गुलाबीसर मलमली फुलांचा गालीचा अंथरलेला असतो. मधेच कुम्भ्याच्या झाडावरून टपकन एखादं मधुरसाने ओथंबलेलं फुल गळून पडतं आणि आपल्याला ते हातात घेऊन तो सुगंध अंगभर हुंगण्याचा मोह आवरत नाही. कोकीळ, सुभग, दयाळ, शामा यांच्या गाण्याने आधीच आपल्याला स्वर्गीय नंदनवनात आणून सोडलेलं असतं. त्यात अचानक बारतोंडीचा सुगंध दरवळतो, आणि खरोखरच वेडं व्हायला होतं. कुठलं पुण्य आपलं, जे या स्वर्गीय सृष्टीच्या सानिध्यात आपण जन्माला आलो.
शहरातसुद्धा हा रंगगंधांचा पुष्पोत्सव सुरूच आहे. रस्ते आणि बागा पेल्टेाफोरमच्या सोनपिवळ्या फुलांच्या गालिचाने नटलेल्या आहेत. आपण वर ओढ्यांच्या काठी पाहिलेले कदंब आणि करंज शहरातसुद्धा फुलले आहेत. कॅडबरीपासून खोपटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा कदंबाची झाडे आहेत. खरं तर कदंब मनमुराद फुलतात भर पावसाळ्यात. पण काही झाडे वसंत ऋतुतही फुलतात. कदंबाची फुलं गोल चेंडूसारखी. नाजूक, पांढऱ्या सुवासिक पाकळ्यांच्या असंख्य छोट्या फुलांचा गुच्छ. याचं खोड सरळसोट आणि फांद्या मात्र गोलाकार छत्रीसारख्या येणाऱ्या. पानं मोठाली, लंबगोल आणि टोकदार. कोकणात नदीच्या काठाने कदंबाचे मोठे वृक्ष आहेत. ठाण्यातही अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने आणि बागेत लावलेली झाडं आढळतात.
करंजाचा मात्र थाटच वेगळा. या ऋतूत चकचकीत पोपटी, मुलायम कोवळी पालवी फुटते आणि त्याचबरोबर गुलबट- जांभळट रंगाचे फुलांचे घोस. झाडाखाली या पातळ पाकळ्यांच्या फुलांचा सडाच पडतो. याच्या शेंगा करंजीच्या आकाराच्या, एकच चपटी डबलबीच्या आकाराची बी असलेल्या. पावसाळ्यात या बिया सहज रुजतात आणि मोठ्या वृक्षाखाली असंख्य छोटी पिल्लं तयार होतात, तेव्हा लेकुरवाळा करंज काय दिसतो.
आपण शहरात तळ्यांच्या, ओढ्यांच्या, नाल्यांच्या काठाने कॉन्क्रीटच्या भिंती घालून पाणी आणि माती यांच्यातील नैसर्गिक देवाण-घेवाणच बंद करून टाकली आहे. त्यांच्या काठावरील मातीत करंज, कदंब रुजायचे, तामण, नेवरी फुलायच्या. त्याऐवजी आता हे वृक्ष कॉन्क्रीटच्या अस्तरात गोठलेले आहेत. त्यांची मुळं खोलवर पाण्याशी नातं ठेवत असतीलही, परंतु त्यांची पिल्लं झाडाखाली माती नसताना रुजणार नाहीत. त्यांच्या बिया पाण्यावर वाहून दुसरीकडे जाणार नाहीत. ते चक्र आपण कायमचं बंद करून टाकलं आहे.
Comments