
मला झाडं बघायला मुळातच आवडतं. लहानपणी घराच्या मागे असलेल्या बागेतून झाडांच्या ओळखीला सुरुवात झाली, ती आता फिल्ड बॉटनीच्या अभ्यासामुळे वेगवेगळ्या जंगलात जाऊन झाडं बघण्यापर्यंत गेली आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या असं लक्षात आलं, कि अनेक जागा तिथे असलेल्या झाडांमुळे माझ्या लक्षात राहतात. म्हणजे कुठलंही नवीन गाव, तिथला रस्ता, जंगलातील पायवाट, ट्रेकिंगचा रस्ता, कुणाच्या घराचं आवार अशा ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा माझं लक्ष जातं ते तिथल्या झाडांकडे आणि नंतर दीर्घकाळही ती जागा आठवली कि आधी मला झाडांचे तपशील आठवतात. एखाद्या जागेशी तिथल्या झाडं-झुडुपांच्या आठवणींनी मी चटकन जोडली जाऊ शकते. आणि मग तिथल्या लोकांसोबतच झाडांशीसुद्धा नवीन नाती तयार होतात.
एखादं झाड आपल्या का बरं लक्षात राहतं? ते कुठल्यातरी आवारात आहे म्हणून किंवा त्यासोबत कुणाची तरी आठवण जोडलेली आहे म्हणून किंवा फुलं आवडली असतील, आपण ते झाड पहिल्यांदाच पाहत असू, इ. अशी अनेक कारणं असू शकतात. साताऱ्याच्या माझ्या मित्राच्या घरावर चढलेला चमेलीचा वेल त्या मित्राइतकाच आठवणीत आहे. आईच्या घरामागच्या बागेतला सोनचाफा, सांगलीला आपटे सरांच्या घराच्या आवारातील जांभळाचं झाड, मावशीच्या आगरातील जामचं झाड, दापोलीच्या कॉलेजमधील सुरंगी आणि बकुळीच्या झाडांच्या रांगा, हॉस्टेलच्या मागची आमराई, पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील प्रचंड पर्जन्यवृक्ष, लकाकी बंगल्यातील कोरीशियाचं झाड, धामापूरच्या आजीच्या घराच्या अंगणातला आंबा, चिवारीतला फणस, परसातला नागचाफा, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील व पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग, आघारकर संशोधन संस्था यांच्या आवारातील तसेच राणीच्या बागेतली झाडं अशी अनेक झाडं त्या त्या वयातल्या माझ्या आठवणींशी जोडलेली आहेत.
आपल्या शहरातसुद्धा लक्षात राहावी, अशी अनेक झाडं आहेत. हेरीटेज ट्री हि संकल्पना आपल्याला नवीन असली तरी पाश्चात्य देशांमध्ये किंवा भारतात अगदी मैसूर, दिल्ली येथे शहरातील काही मोजक्या झाडांना ‘हेरीटेज ट्री’ हा दर्जा देण्यात आला आहे. काय आहे हि संकल्पना? आपल्याकडे वड, पिंपळ, उंबर, आंबा, इ. झाडांना धार्मिक महत्व आहे. हि झाडं सहसा कोणी तोडायला धजावत नाही. त्याचबरोबर एखाद्या मंदिराच्या परिसरात असलेलं जुनं झाड, एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या आवारातील झाडं, यांनाही त्या वास्तूइतकंच महत्व असतं. आळंदीला माउलींच्या समाधीवरील अजानवृक्ष किंवा गौतम बुद्धाला साक्षात्कार झाला तो पिंपळ हि आपल्या अगदी जवळची उदाहरणं.
ठाणे शहराचा विचार केला, तर अशी कुठली झाडं आपल्याला आठवतात? कलेक्टर ऑफिसच्या आवारातील दिवी दिवीचे दोन वृक्ष, टाऊन हॉलच्या आवारातील ट्रेविया न्यूडीफ्लोरा हा वृक्ष, गडकरी रंगायतनसमोरील किंवा रायलादेवी तलावाच्या परिसरातील प्रचंड बाओबाबचे वृक्ष, आमच्या लुईसवाडीतील ग्रीन रोडवरील खिरणीचं झाड, बारा बंगल्याच्या आवारातील मोठे वृक्ष, याच बरोबर कोलशेत रोडवरील जुनी वडा- पिंपळाची झाडे अशी अनेक झाडं एकमेवाद्वितीय आहेत. यांतील अनेक झाडं शंभर वर्षांपेक्षाही जुनी आहेत. त्यांचा पसारा काही हजार फूट क्षेत्रफळ होईल इतका आहे. यांतील वड, पिंपळ, उंबर, आंबा, चिंच हि झाडे असंख्य पक्षी, कीटक यांना खाद्य व निवारा पुरवतात. यातले एक एक झाड हे स्वतःमध्येच एक विश्व असल्यासारखे आहे.
जगभर हेरीटेज ट्री या संकल्पनेत त्या झाडाचे वय, पसारा, ऐतिहासिक महत्व, प्रजाती, स्थानिक पर्यावरणासाठी महत्व, सौंदर्य असे अनेक मुद्दे लक्षात घेतले जातात. अशी झाडं घोषित करून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकार व नागरिक प्रयत्न करतात. आपण असं ठाण्यासाठी करू शकतो का? तर हो. काही वर्षांपूर्वी ठाण्यातील हरियाली या संस्थेने ठाण्यातल्या शंभर पेक्षा जास्त वय असलेल्या शंभर झाडांची यादी बनवली आहे. आम्ही ‘फर्न’संस्थेमार्फत या महिन्यापासून ‘ठाणे हेरीटेज ट्री वॉक’ या कार्यक्रमाअंतर्गत या झाडांशी आपली ओळख करून देणार आहोत. यांतील अनेक झाडं सध्या दुर्लक्षित आहेत किंवा शहराच्या विकासाला बळी पडत आहेत. चला तर मग, आपल्या ठाण्यातली जुनी, ऐतिहासिक, दुर्मिळ झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न करूया.
I am also a freiend of trees. I was reading blogs on this site. In one blog there is a photo
of a huge tree and a lady standing there. I would like to know which is this tree and
where it can be seen ? Would lie to join this group. Vijay Soman
treefriend55@gmail.com, Mulund, Mumbai. 29-5-2021