
या आठवड्यात कोकणात आलेय. माझं आजोळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळील देवधामापूर. समुद्रापासून हे बरंच आत असल्यामुळे इथे आंबे- फणस उशीरा तयार होतात. या वर्षी जून उजाडला तरी अजून पाऊस झाला नाहीये. पण त्यामुळे जांभळं, करवंद भरपूर आहेत. पाऊस पडला की यांच्यावर लगेच कीड पडते आणि मग आजोबा ती खायला मनाई करतात. आजीच्या घराच्या मागे परह्या आहे. याला फक्त पावसाळ्यात पाणी असतं. परह्याच्या काठाने जांभळी, अर्जुन यांचे वृक्ष आहेत. काही वर्षांपूर्वी या परह्यावर सिमेंटचा एक छोटा बांध घातला. मागच्या बाजूस पाणी अडल्याने तिथली जांभळीची झाडं कुजून गेली. काही तोडली गेली. दर वर्षी धामापूरला गेले, की आधी मी मागे परह्यावर जाऊन पाहते, आणि मग अजून कुठकुठली झाडं तुटली याचा हिशोब माझ्या डोक्यात सुरू होतो. ओढ्याच्या काठावरची झाडी नष्ट झाल्यास मातीची प्रचंड धूप होऊन इतका गाळ साठेल की त्या बांधलेल्या बांधाचा काही वर्षांनी काहीच उपयोग होणार नाही.

आमच्या गावातून सप्तलिंगी नावाची नदी वाहते. टिकलेश्वरच्या डोंगरात उगम पावणारी ही नदी बाव नदीला मिळून पुढे अरबी समुद्राला मिळते. या नदीवर शंकराची स्थानं आहेत, म्हणून ही सप्तलिंगी. चन्द्रेश्वर नावाचं एक अप्रतिम सुंदर ठिकाण हिच्या काठावर आहे. या नदीच्या काठावर ताम्हण, नेवर, अर्जुन, उंबर, जांभूळ या वृक्षांची दाटी आहे, पात्रात गवत आणि लव्हाळ्याची बेटं आहेत. सहा प्रकारचे किंगफिशर मीच या ठिकाणी पाहिले आहेत. या नदीवरसुद्धा ठिकठिकाणी बांध घालण्याची कामं सुरू आहेत. पाणी अडलं की काठावरील झाडी नष्ट होणार, बाजूची झाडी आधीच तुटली आहे, त्यामुळे मातीची धूप होते. ही संपूर्ण परिसंस्थाच नष्ट होण्याचा धोका आहे. इतकी छोटी नदी मुक्तवाहिनी असणं फार महत्त्वाचं आहे.
आता डोंगरात खैराची, पांढऱ्या कुड्याची झाडं फुलली आहेत. पावशाचं ‘पेर्ते व्हा’ सुरू आहे. ब्लॅकबर्ड, दयाळ, सुभग, ऑरेंज हेडेड थ्रश, शामा यांच्या सुरेल लकेरी ऐकू येतायत. शेजारच्या ताम्हाने गावात जाखाई देवीची देवराई आहे. इथल्या मूळ जंगलाच्या रूपाची झलक इथे पाहायला मिळते. इथली झाडी इतकी गर्द आहे की लहानपणी संध्याकाळी आम्ही इथे जायला घाबरायचो. आता देऊळ नवीन बांधलं, तिथपर्यंत रस्ता केला, बाजूचा रस्ता रुंद केला, देवराईच्या आसपास घरं झाली, या सगळ्यामुळे राईचा बराचसा भाग मोकळा झालाय. तरीही उरलेल्या काही गुंठ्यांच्या भागात उत्कृष्ट जंगल टिकून आहे. नरविलिया जातीचं एक जमिनीवर येणारं ऑर्किड इथे मोठ्या संख्येने आढळतं. दर वर्षी पहिला पाऊस पडून गेल्यावर आम्ही इथे येत असल्याने अनेक वर्षं आम्ही ते पाहतोय. या वर्षी अजून पाऊस पडला नसल्याने पाचोळ्यातून येणारी इवली नाजूक जांभळी फुलं पाहायला मिळाली नाहीत. देवराईचा राहिलेला भाग यापुढे असाच टिकून राहील, अशी आशा करायला हरकत नाही.

या वर्षी उन्हाळा लांबल्याने आंबे फार छान आले. रस्त्याच्या दुतर्फा, रानात रायवळ आंब्याचे पेर पडलेत. खाऊन किती खाणार? वानरांची चंगळ आहे. या रायवळ आंब्यांची गम्मत असते. प्रत्येक आंबा वेगळा. आमच्या घरी पूर्वी सतरा वेगवेगळ्या प्रकारचे रायवळ आंबे होते, असं आजोबा सांगत. खैरातला, मधम्बी, टोकंबा, बिटकी, पांढरंबा, भोपळी आंबा, वांग्यातला, धोधम्बा, असे अनेक प्रकार. तसेच फणसाचे पण. चिवारीतला, कोनातला, भाटल्यातला, वाळक्या, शेणक्या, बावीतला असे काप्या आणि बरक्या फणसाचे अनेक प्रकार. इथे काजूला जांबी म्हणतात आणि बकुळीला ओवळी.
एक भलाथोरला पिंपळ आहे, जिथे अमावास्येला नारळ दिला जातो. शिमग्यात आमच्या घरची होळी या पिंपळाच्या खाली पेटवतात. आजीच्या परसात नागकेसराचं झाड आहे, रिंगी म्हणजे रिठ्याचं झाड आहे. घर नवीन बांधलं तेव्हा तीन बकुळी आणि बिटकी तोडली, त्याची आठवण आज घराचे वासे, माडीच्या फळ्या, रिपा यांच्या रूपाने कायम आहे.
लागवडीसाठी, घरांसाठी, रस्त्यांच्या कामासाठी, अडचणीला पैसे हवेत म्हणून दर वर्षी हजारो झाडं तुटतायत, डोंगर बोडके होतायत. धामापूरमधूनच रोज ट्रक भरून लाकडं घाटावर कोल्हापूरला जातात. माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत कमी होत गेलेलं जंगल मी पाहिलं आहे आणि त्याचं प्रमाण दर वर्षी वाढतंच आहे. आमच्या आज्या पणज्यांनी लावलेली झाडं आपण तोडतोय पण त्याप्रमाणात नवीन झाडं लावली जात नाहीयेत. इथलं जंगल टिकवून ठेवण्यासाठी जोपर्यंत लोकांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. पण नजीकच्या भविष्यात तेही होईल. कारण प्राणवायू आणि पाण्यासाठी आपल्याला झाडं टिकवावीच लागतील.

Moving to thane . Need to shift house items using packers and movers in thane , so I am testing the companies of https://www.assureshift.in/packers-and-movers-thane , hopefully you can use it for relocation as well .