top of page
Search
  • Writer's pictureSeema Hardikar

विदेशी वृक्षांच्या दुनियेत

शरदिनी डहाणूकरांच्या ‘हिरवाई’शी माझी ओळख शाळेत असताना झाली. माझ्या मोठ्या आत्याने वाढदिवसाची भेट म्हणून हे पुस्तक मला दिलं. घरी आई आणि काकाला फुलझाडांची आवड असल्यामुळे घराजवळ त्यांनी सोनचाफा, बेल, नारळ, कढीलिंब, अनंत, पारिजातक यांसारखे वृक्ष, चमेली, सायली या वेलींचे मांडव, मोगऱ्याचा ताटवा, सोनटक्क्याचं बेट, विविध प्रकारच्या जास्वंदी, गुलाब, तसेच कुंद, अबोली, कोरांटी अशी अनेक फुलझाडं लावली होती. शाळेत आपल्या आवडत्या बाईंना घरची फुलं नेऊन देण्यात इतकी मजा वाटायची. पुढे शाळा-कॉलेज मधे असतानाच शरदिनी डहाणूकरांचं ‘वृक्षगान’, दुर्गा भागवतांचं ‘ऋतुचक्र’, श्रीश क्षीरसागरांची ‘बहर’ आणि ‘फुलवा’ यांतून आपल्या आजूबाजूच्या वृक्ष-वेलींशी ओळख होत गेली. मग श्रीकांत इंगळहळीकरांचं ‘Flowers of Sahyadri’ आलं आणि त्यातून रानफुलांचं विश्व खुलं झालं. महाजन सरांची ‘आपले वृक्ष’, ‘देशी वृक्ष’, ‘विदेशी वृक्ष’, प्रदीप क्रीशेनचं ‘Trees of Delhi’ आणि इंगळहळीकरांचं ‘Trees of Pune’ ही पुस्तकं रोजच्या वापरातली होऊन गेली. माझ्या शेतीशास्त्राच्या अभ्यासाबरोबर मी Field Botany आवड म्हणून शिकले. हळूहळू हे आपल्याला जास्त आवडतंय असं कळत गेलं आणि मग झाडं ही माझ्या शरीराइतकीच माझी बनून गेली.

शास्त्रीय पद्धतीने Field Botany शिकताना Florasशी ओळख झाली. पण मला Field Guidesच जास्त आवडतात. आपल्या शहरातल्या आपल्या आजूबाजूच्या झाडांची ओळख करून घेण्यासाठी वरील सर्व पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत. यांमध्ये शहरात बागांमधून किंवा रस्त्याच्या कडेने आवर्जून लावले गेलेले अनेक विदेशी शोभिवंत वृक्ष आपल्याला भेटतात. आपल्या ठाण्यात तसा दुर्मिळ असणारा ब्राउनिया (Brownia coccinea) यांतीलच एक. हिरानंदानी इस्टेटमधील पब्लिक गार्डनमध्ये याचं झाड सध्या फुललं आहे. छोटेखानी असा हा वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजचा. बराचसा आपल्या सीता अशोकसारखा दिसणारा. परंतु याचं खरं सौंदर्य आहे याच्या फुलांमध्ये. लांबट पातळ पाच पाकळ्यांची लाल-गुलबट फुलं आणि अशा पन्नासएक फुलांचा गुच्छ. हि फुलं झुंबरासारखी उलटी लटकणारी आणि झाडाच्या पर्णसंभारात लपलेली. राणीच्या बागेत ब्राउनियाचे काही वृक्ष आहेत. कलकत्त्याच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये अनेक मोठे फुलणारे वृक्ष आहेत. ठाण्यात याचे झाड नाही म्हणून मी काही वर्षांपूर्वी दोन रोपं माझ्या कुंडीत वाढवून दत्ताजी साळवी उद्यानाला भेट दिली होती. पण ती फुलायला अजून एक दशक तरी लागेल.

अजून एक तसं दुर्मिळ असणारं झाड म्हणजे गम ग्वायकमचं (Guaiacum officinale). हा वृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेतील. वागळे इस्टेटमधील पासपोर्ट ऑफिसकडून लुईसवाडीकडे येताना डावीकडच्या कंपनीच्या आवारात हे झाड आहे. माझ्या माहितीत तरी ठाण्यातील हे एकमेव झाड आहे. राणीच्या बागेत मात्र या झाडांचा अख्खा अॅव्हेन्यू आहे. साधारण फेब्रुवारी- मार्चमध्ये याला जांभळट फुलांचे घोस लागतात. आणि पिवळट-हिरवट सालीची, बारीक गोलसर पानांची लिग्नम व्हायटी एकदम नजरेत भरते. हा बहर केवळ काही दिवसच टिकतो. इतर वेळी तुरळक फुले दिसतात, पण संपूर्ण बहरलेल्या झाडाचा साज काही वेगळाच. या दुर्मिळ झाडांबरोबरच रस्त्याच्या कडेला सर्वत्र लावलेली स्पॅथोडिया आणि गुलाबी टॅबेबुयासुद्धा सध्या बहरात आहेत.

सुरुवातीला या रंगीबेरंगी फुलांच्या विदेशी झाडांचं मलाही अप्रूप होतं. आणि ती क्वचित बघायला मिळायची. आता मात्र या शहरी झाडांमध्ये मन रमत नाही. अजूनही रस्त्याने जातायेता नेहमीची झाडं फुललेली दिसली कि आनंद होतोच. कुणाला तरी सांगावसं वाटतं. पण खरं मन रमतं ते जंगलातील वृक्षराजीत. नैसर्गिक रुपात. झाडांना नीटनेटकं आपल्याला हवं तसं, हवं तिथे वाढवणं मुळातच मला आवडत नाही. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात प्राण्या-पक्ष्यांसाहित पाहणं मला अधिक भावतं. त्यातही आपल्या जवळच्या पानझडी जंगलांपेक्षा महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर इथल्यासारख्या सदाहरित जंगलाचं आकर्षण सध्या तरी जास्त आहे. भर उन्हाळ्यातला इथला शीतल गारवा, वृक्षांच्या घनदाट हिरव्या छत्र्या पाहून मोहून जायला होतं. अशा जंगलातला एखादा तुकडा आणि त्यातून वाहणारा झरा.... माझी अंतिम सुखाची कल्पना इथेच येऊन थांबते.


28 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page