top of page
Search
Writer's pictureSeema Hardikar

निसर्गातील रंगोत्सव

नुकतीच होळी झाली. आपल्याकडे परंपरा म्हणून होळीत लाकडे, भाताचा पेंढा जाळायची पद्धत आहे. माझ्या आजोळी कोकणात तर एखादा सरळसोट उंच वाढलेला जंगली आंबा तोडून आणून माड म्हणून उभा करतात. माझ्या आजोबांनी या पद्धतीला पुष्कळ वर्षे विरोध करून पहिला, परंतु ती अजून चालू आहे. दर वर्षी एका जंगली आंब्याच्या झाडाचा बळी जातोच.

दुर्दैवाने आपण शिकले- सवरलेले शहरवासीयसुद्धा काहीही विचार न करता इथेही होळी साजरी करतो. आपल्याकडे लाकडांचा तुटवडा असल्यामुळे मिळेल ते, अगदी फर्निचर जाळून सुद्धा. झाडाने वर्षानुवर्षे साठवलेला कार्बन आपण आपल्या मजेसाठी काही मिनिटांत पुन्हा हवेत सोडून देतो. जागोजागी होळ्या पेटवल्याने तापमान वाढते ते वेगळेच. आधीच शहरात सर्वत्र सिमेंट- कॉंक्रीटच्या इमारती, रस्ते आणि वृक्षांचे घटते प्रमाण यांमुळे तापमान चढेच असते. त्यात अजून होळ्यांची भर. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे आपल्यासाठी केवळ चर्चेचे विषय झालेत. चावून चोथा झालेले. आपली जीवनशैली मात्र जास्तीत जास्त कर्बोत्सर्जनाकडे जाणारी आहे.

धुलीवंदनाच्या दिवशीसुद्धा आपण रासायनिक रंग वापरतो, पाण्याची नाहक नासाडी करतो. ठाण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करू म्हणून जाहीर करूनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर प्लॅस्टिकचे फुगे आणि पिशव्या यांचा कचरा या दिवसांत दिसला. किती असंवेदनशील आणि बेशरम आम्ही. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ आणि ठाण्या- मुंबईत पाणी कपात सुरु असताना खेळण्यासाठी पाण्याची चैन करणे किती योग्य आहे, याचा विचार आपण कधी करणार? तरी अलीकडे अनेक जण घरच्या घरी फुलांपासून, भाज्यांपासून रंग बनवतात. नैसर्गिक रंगही बाजारात मिळतात. आपणच रासायनिक रंग खरेदी न करून ती बाजारपेठ बंद करवली पाहिजे. मुलांना यापेक्षा विधायक गोष्टींकडे कसं वळवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.

याकरिता एक पर्याय मी सुचवेन. याच मोसमात आपल्याकडे वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते. जंगलात सावर, पांगारा, पळसाच्या निष्पर्ण वृक्षांवर गुलाबी- लाल- केशरी रंगांची उधळण चालू असते. कुसुम वृक्षाच्या लाल- किरमिजी पालवीने आसमंत नटलेला असतो. शहरातही या काळात पिवळा आणि गुलाबी टॅबेबुया, तामण, वरुण यांच्या विविधरंगी फुलांचे गुच्छ आभाळाला स्पर्श करत असतात.



आपल्या भोवतीचे आकाश अशा विविध रंगानी नटलेले असताना आणखी वेगळ्या, कृत्रिम रंगोत्सवाची गरजच काय? तेव्हा जरा डोळे उघडे ठेवूया आणि मन थोडे संवेदनशील बनवूया. मग पहा, निसर्ग आपल्याला किती निखळ आनंद देतो ते.

जेव्हा हि झाडे आपण पाहायला सुरुवात करतो, तेव्हा नुसत्या त्यांच्या रंगसंगतीने नाही तर त्यांच्या सुगंधानेही आपले मन प्रफुल्लीत होते. सेंट जॉन दि बाप्टीस्ट हायस्कूलच्या आवारात सध्या मुचकुंद (Pterospermum acerifolium) फुललाय. अगदी खालपासून फांद्या फुटलेलं हे झाड म्हणजे एका ठिकाणी अनेक झाडांचं बेटच

आहे असं वाटतं. मुचकुंदाची पानं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. सामान्यतः पानाचं देठ हे पानाच्या कडेला जोडलेलं असतं. याच्या बाबतीत मात्र ते पर्णपत्राच्या तळाच्या वर मध्येच जोडलेलं असतं. वनस्पतीशास्त्रात या प्रकारच्या पानाला पेल्टेट असं म्हणतात. आपल्याकडे आढळणाऱ्या चांदाड्याची पानेही अशीच. म्हणून त्याचं नावच Macaranga peltata.

तर मुचकुंदाची पानं खालच्या बाजूने पांढरट असतात. फुल उमललं कि त्याच्या बाहेरचं आवरण (संदल) हे अगदी सोललेल्या केळ्यासारखं दिसतं. आणि आतल्या तलम मुलायम पांढऱ्या लांबट पाच पाकळ्यांचं सुगंधी फूल हे म्हणजे सौंदर्याचं लेणंच जणू. आपण गेल्या वेळी पाहिलेल्या जंगली बदाम किंवा कांडोळाच्या कुळात मुचकुंदाचा समावेश होतो.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कोर्टाच्या आवारात सध्या वरुण किंवा वायवर्ण (Crataeva adansonii) फुललाय. ठाण्यात शिवाई नगरच्या बसस्टॉपजवळ, पाचपाखाडीत प्राईम रोज सोसायटीच्या आवारात तसेच इतरही काही ठिकाणी हि झाडं आहेत. पण तशी दुर्मिळच. वरुणची पानं दिसायला अगदी बेलाच्या पानांसारखी. त्रिदले. पण झाडाला काटे नसतात. आपल्याकडे वरुणला वर्षातून दोन-तीनदा बहर येतो.



फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास झाड सगळा पर्णसंभार उतरवून ठेवतं. आणि पांढऱ्या-पिवळ्या नाजूक फुलांचे गुच्छ मिरवू लागतं. वरुणची रोपं मुळांच्या फुटव्यांपासून भरभर वाढतात. हि मुख्य झाडापासून अलग करून अनेक ठिकाणी लावली पाहिजेत म्हणजे या स्वर्गीय फुलांचं सौंदर्य सगळ्यांनाच अनुभवता येईल.

56 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page