आपण ठाणेकर किती भाग्यवान नं, कि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एक बाजू आपल्या शहराला लागून आहे. यामध्ये मामा- भांज्याचा डोंगर आहे, येऊरचा डोंगर आहे. येऊर गाव आहे, पाटोणपाडा आहे. मानपाड्याचं निसर्ग परिचय केंद्र आहे. घोडबंदर रस्त्याने जाताना डावीकडे सलग ज्या डोंगररांगा दिसतात त्या सगळ्या या जंगलाचा भाग आहेत. माझा जन्म झाला तेव्हा आई-बाबा येऊरला राहत होते. सहा वर्षांपर्यंत माझं बालपण तिथे गेलं. या काळातल्या माझ्या विशेष आठवणी नसल्या तरी तेव्हापासून या जंगलाबद्दल मला एक विशेष ओढ आहे. इथल्या झाडा-झुडुपांशी इतकं घट्ट नातं आहे, कि अगदी डोळे मिटून जरी मी येऊरचा चढ चढायला लागले तरी मी आजूबाजूची झाडं सांगू शकेन.
शाळा-कॉलेज मध्ये असताना हरियाली, होपच्या सदस्यांबरोबर या जंगलात भरपूर भटकंती केली. त्यानंतर फिल्ड बॉटनीत आपल्याला विशेष रस आहे हे जाणवल्यानंतर तर मग मी मोकाटच सुटले. निसर्गचक्र आणि ऋतूबदलाचा अभ्यास करण्यासाठी तर या जंगलाइतका समर्थ गुरु नाही. प्रत्येक आठवड्याला तुम्ही जाल तर जंगलाचं एक वेगळंच रूप तुम्हांला दिसेल.
सध्या हेमंत ऋतू सुरु आहे. बहुतांशी झाडांची पानं गळून गेली आहेत. काटेसावर, देवसावर, पांगारा, साग, काळा कुडा, कांडोळ अगदी निष्पर्ण झाले आहेत. पळसावर अजून पाने शिल्लक आहेत. काही अगदी तुरळक ठिकाणी एखादा पळस, काळा कुडा किंवा काटेसावर फुलायला लागली आहे. पण ऐन बहरात आहे ती देवसावर. बुलबुल, कोतवाल, शिंजीर, पर्णपक्षी यांच्या फुलातील मधुरस पिण्यासाठी सतत देवसावरीवर वाऱ्या चालू आहेत. वावळ फुलावर आलाय. अगदी दिसतील न दिसतील अशी याची बारीक फुलं. पण थोड्याच दिवसात पापड्या म्हणजेच याची फळे तयार झाली की संपूर्ण झाड त्या चकचकीत हिरव्या पापड्या वाऱ्यावर हलवत अच्छा करतंय असं वाटतं. मामा भांज्याच्या डोंगरात सकाळ संध्याकाळ लोखंडीच्या सुगंधात नाहून निघतायत. डोंगर उतारावर पांढऱ्या गुळगुळीत खोडांचे कांडोळ फुललेत. बारीक नाजूक हिरवी मखमली फुलं. बाकी तसे अजून बरेचसे वृक्ष-लता सुप्तावस्थेत आहेत. जमिनीतला ओलावा आता आणखी कमी कमी होत जाईल. अजून थंडीचा एखाद महिना बाकी आहे. होळीनंतर उन्हाचा कडाका वाढायला लागेल. तोपर्यंत हि सगळी झाडं फुलांनी आणि नवीन पालवीने डवरून जातील.
जंगलात सर्वत्र सुकलेला पाचोळा आणि गवत आहे. कारवीची झुडुपंसुद्धा सुकली आहेत. आग पसरू नये म्हणून वनविभागाची माणसं आता जाळरेषा काढण्यात व्यस्त आहेत. सकाळच्या थंडीत जंगलातल्या पाउलवाटेवर गेलात तर सागाच्या पानांवरून आवाज न करता चालण्याची कसरत करावी लागेल. नाहीतर आपल्याच चालण्याचा इतका आवाज येतो, कि पक्षी कुठले थांबायला. गवताचं सुकलेलं बी सगळ्या कपड्यांना लागतं. टोचत राहतं. त्याला काट्यासारखा बारीक ऑन (Awn) असतो नं. मग मध्येच थांबून ते कपड्यांना लागलेलं बी काढून टाकायचं आणि पुन्हा चालू पडायचं. उघड्यावरुन जरा जंगलात शिरलात कि लगेच हवा उबदार होते. कशी गम्मत आहे नं. जंगलात थंडीच वाजत नाही. डोंगराच्या कडेवर गेलात कि मग मात्र घोंघावणारा वारा भणाणून टाकतो. डोंगराच्या कडेवरून एका बाजूला अगदी खाडीपर्यंत शहर पसरलेलं दिसतं, बरेचदा धुरक्याने वेढलेलं आणि दुसऱ्या बाजूला नजर जाईल तिथपर्यंत जंगलाने वेढलेले डोंगर. अगदी लक्ख उन्हात न्हात असलेले, क्वचित धुक्याची चादर लपेटलेले. आणि मग मला नेहमी पडणारा प्रश्न पडतो, आपण नक्की कुठे राहिलं पाहिजे?
त्याच धुंदीत मी शहराच्या बाजूच्या वाटेने खाली उतरते. पुन्हा त्याच रानवाटेवर परत जाण्याची आशा घेऊनच.
Comments