Search
  • Seema Hardikar

मैत्री करू या वृक्षांशी

आपल्याकडे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल आतापासूनच लागली आहे. आम्रवृक्ष मोहोरलेत, त्यांच्यावर कोकीळकूजन सुरु झालेलं आहे. पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु झाल्यामुळे दयाळ, बुलबुल. नाचण पहाटेपासून गायला लागलेत. जंगलात आणि शहरातही अनंत प्रकारच्या वृक्ष-वेली फुलण्याचा हा हंगाम.

दत्ताजी साळवी उद्यानात किंवा उपवनजवळच्या व्होल्टास कंपनीच्या बंगल्यांच्या आवारात सीता अशोक (Saraca asoca) फुलायला लागलेत. याची फुलं आपल्याला परिचित असलेल्या एक्झोऱ्यासारखी. पिवळ्या-केशरी-लाल रंगांची, मोठाले पुंकेसर असलेली, घोसाने येणारी. आपल्या जंगलात आढळणारा हा अत्यंत देखणा सदाहरित वृक्ष. अलिबाग जवळच्या कनकेश्वराच्या डोंगरावर अशोकवन म्हणावं इतकी विपुल झाडं आढळतात. सीतेला रावणानं अशोकवनात ठेवलं होतं म्हणतात, तो हाच अशोक. सुंदरींच्या लत्ताप्रहाराने फुलणारा म्हणूनही तो प्रसिध्द आहे. या अशोकाला येणारी नवीन पालवी गुलबट किरमिजी रंगाची, मुलायम आणि खाली लोंबणारी. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण.आपल्या सगळ्यांना जरा जास्तच परिचयाचा असलेला खोटा अशोक किंवा आसुपालव (Polyalthia longifolia) वेगळा. हा मूळचा श्रीलंकेतला. आपल्याकडे शाळा-सोसायट्या-कंपन्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात लावला गेलेला. पक्षी आणि वटवाघळं याची फळं आवडीने खातात. आत्ता जाऊन बघितलंत तर झाडाखाली काळसर गराचा आणि बियांचा खच दिसतो. विंड ब्रेक म्हणून याच्या सरळसोट झाडांची रांग लावण्याची पद्धत आहे. याचीच आडव्या, पसरणाऱ्या फांद्या असणारीही एक पोटजात आहे.

आंबे-घोसाळे तलावाच्या बाजूच्या श्रीरंग सोसायटीमधील बिल्डिंगच्या आवारात एक खास झाड आहे. तलावाकडच्या बाजूला ते नखशिखांत फुललंय. कागदी झिरमिळ्यांसारखी फिकट पांढऱ्या रंगाची सुवासिक फुलं असलेला हा अंकोळ (Alanjium salviifolium). आत्ता एलिफंटा आयलंडला गेलात, तर तिथे हि झाडं पुष्कळ फुललेली पाहायला मिळतील. ठाण्यात इतरही काही ठिकाणी हि झाडं आहेत. याच्या फुला- फळांवर पुष्कळ कीटक, पक्षी येतात.

एस टी वर्कशॉपच्या पार्सल ऑफीसच्या बाजूला ‘अजान’चं झाड आहे. आळंदीला ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवरील हाच तो अजानवृक्ष (Ehretia laevis). छोटी, नाजूक, पांढरी, पाच त्रिकोणी पाकळ्यांची सुवासिक फुलं आणि त्यांचे विरळ गुच्छ. त्याचबरोबर हिरव्या- केशरी छोट्या फळांचे घोसही पाहायला मिळतील. खाली पडलेली याची फुलं अगदी चांदण्यांसारखी दिसतात. फळांमध्ये गर असला तरी त्याला फारशी चव नसते. पण पक्षी ती आवडीने खातात. ठाण्यात अजानवृक्ष तुरळक प्रमाणात आहेत. याच्या मूळ झाडाच्या आजूबाजूला मुळांच्या फुटव्यांपासून रोपं तयार होतात. परंतु त्यासाठी झाडाखाली माती हवी. अशी रोपं अलगद काढून वेगळी लावता येतात. बियांपासुनही रोपं तयार करता येतील. माउलीभक्तांनी जरूर आपल्या कुंपणात याचे झाड लावावे.

याच पांढऱ्या सुगंधी फुलांच्या संप्रदायातील आत्ता फुलणारे पुढील पुष्प आहे ‘शिरीष’ (Albizia lebbeck). आपल्यापैंकी बरेच जण रेन ट्रीला शिरीष समजतात. परंतु रेन ट्री (Albizia saman) आहे मूळचा दक्षिण अमेरिकेतील, तर शिरीष अगदी अस्सल भारतीय. ठाण्यात सध्या हे दोन्ही वृक्ष फुललेत. परंतु शिरीष अभावानेच आढळतात. रेन ट्रीची फुलं गुलाबी रंगाची, पावडर पफसारखी. तर शिरीषाची तशीच, पण पांढऱ्या-हिरवट रंगाची आणि अप्रतिम सुगंधी. एखादा पूर्ण वाढलेला शिरीष बहरला कि त्याचा सुगंध अगदी दूरदूरपर्यंत आसमंतात पसरतो. शिरीषच्या शेंगा पांढऱ्या पापुद्र्यासारख्या, चकचकीत, लटकणाऱ्या. तर रेन ट्रीच्या काळ्या, ओबडधोबड आकाराच्या. याच्याही बियांपासून सहज रोपं तयार करता येतील.

परवा रात्री फेरफटका मारताना अचानक मोगरीच्या गजऱ्याचा सुगंध घमघमला, तत्क्षणी मी म्हटलं, बारतोंडी फुललीये. याचा गंध एकदा घेतला कि विसरणंच शक्य नाही. काही ठिकाणी कदंबांवर गेंद फुललेत, तुरळक बहावा आणि तामण फुलायला लागलेत. गुलाबी टॅबेबुया फुलून गेले आणि आता पिवळे टॅबेबुया फुलायला लागलेत. हे मुळचे दक्षिण अमेरिकेतील वृक्ष आपल्याकडे उद्यानांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला लावले आहेत. हा हंगाम आता पुढचे दोन महिने तरी असाच चालू राहिल. सकाळी लवकर उठून फेरफटका मारायला जात असाल तर यांपैकी कित्येक आपल्याला वाटेवर भेटतील. त्यांच्याशी हितगुज करावी. कुणास ठाऊक, यांच्यापैकी काही आपले दोस्त बनून जातील.45 views

©2019 by Foundation for Educational Rendezvous with Nature.