top of page
Search
Writer's pictureSeema Hardikar

जंगली बदाम आणि त्याचं कुळ



लुईसवाडीत आमच्या घराशेजारीच जंगली बदामाचं भलंथोरलं झाड आहे. तीन मजली इमारतीच्या गच्चीच्याही वर एखाद मजला भरेल इतकं उंच. खोड सरळसोट आणि फांद्या गोलाकार छत्रीसारख्या, पण तिसऱ्या मजल्याच्या वरच. याच्या खांबासारख्या सरळ बुंध्यावर गळून पडलेल्या फांद्यांचे व्रण किस मार्क सारखे दिसतात. वर्षंभर काटेसावरीसारख्या सात ते दहा पर्णिका असलेली तळहातासारखी संयुक्त पानांची छत्री त्याच्यावर असते. आणि अचानक हिवाळ्याच्या शेवटी हे झाड आपली सगळी पानं गाळून निष्पर्ण होतं. अगदी काही दिवसांसाठीच. सोसायटीत मग पातेऱ्याचा ढीग साठतो. आणि मग एक परिचित उग्र असा गंध आसमंतात पसरला की आम्हांला कळतं, कि जंगली बदाम फुललाय. याचं शास्त्रीय नाव Sterculia foetida. म्हणजे जनावरांच्या विष्ठेसारखा घाण वास असलेला. बिचाऱ्याचं हे असलं नाव पडलंय याच्या फुलांवरून. एरवी हा वास सगळ्यांना अप्रियच, परंतु आमच्या सलीलसारखं हा वास आवडतो म्हणणारं अजून कोणीतरी असेलच.

तर याची फुलं दिसायला देखणी, बोटाच्या पेराएवढी, लाल- किरमिजी लव असलेल्या पाच पाकळ्यांची. जंगली बदामाच्या निष्पर्ण फांद्यांवर आधी फुलांचे घोस लागतात आणि पाठोपाठच कोवळी लालसर पोपटी रंगाची पालवी फुटते. सध्या ठाण्यात सगळीकडे हे वृक्ष फुललेत. हा अस्सल देशी वृक्ष ठाणे- मुंबईत रस्त्याच्या कडेने किंवा बागांमध्ये अनेक ठिकाणी लावलेला आढळतो. याची फळं फारच वैशिष्ट्यपूर्ण असतात. करंजीच्या आकाराची. चार-पाच फळांचे घोस एकत्र लटकताना दिसतात. हि नंतर एका बाजूने उकलतात आणि त्यातून काळ्या द्राक्षाच्या आकाराच्या टणक बिया बाहेर पडतात. याच्या बिया भाजून खातात. उकललेली फळं नंतर कितीतरी महिने झाडावर तशीच असतात. पावसाळ्यात खाली पडलेल्या या बिया आपल्या आपण रुजून आमच्या सोसायटीत दर वर्षी या जंगली बदामाची शंभर एक पिल्लं तयार होतात. पावसाळ्याच्या शेवटी ती काढून पिशव्यांमध्ये लावली कि अगदी दोन- तीन वर्षं आपल्याकडे वाढवून मग आम्ही ती वृक्षारोपणाकरिता देतो. एखादं पूर्ण वाढलेलं फुलणारं फळणारं झाड आपल्या सोसायटीत असेल तर त्याच्या खाली जरूर मातीची जमीन असू द्या. प्रत्येक पावसाळ्यात कितीतरी रोपं आपली आपण तयार होतील. परंतु हल्ली बुंध्यापासूनच कॉंक्रीट टाकल्यामुळे बिचाऱ्या झाडांना आपली पिल्लावळ वाढवताच येत नाही. बिया सगळ्या कचऱ्यात जातात. कधी कधी मला प्रश्न पडतो, आपली पिल्लं रुजत नाहीत हे झाडाला कळत असेल का? ते फळायचं बंद तर नाही ना करणार?

या जंगली बदामाचे अनेक भाईबंद आपल्या जंगलात आढळतात. घोस्ट ट्री म्हणून सर्वांना परिचित असलेला कांडोळ (Sterculia urens) हा याचाच भाऊ. याच्या पांढऱ्या गुळगुळीत खोडामुळे आणि वेड्यावाकड्या आकारामुळे त्याला हे नाव पडलंय. कांडोळाला सध्या पंचदळांसारखी लव असलेली फळं लागली आहेत. यांना चुकून सुद्धा हात लावायचा नाही. खाजकुईलीसारखी खाज लागते. लवकरच पोपटी पालवीच्या छत्र्या कांडोळावर येतील. याचा दुसरा भाऊ म्हणजे कुकर (Sterculia guttata). याची पानं साधी, लांबट आणि देठावर लव असणारी. फळं आणि बिया साधारण जंगली बदामासारख्याच. जंगलात ब्राऊन हेडेड बार्बेट याच्या बिया खाताना आम्ही पहिला आहे. दोन- तीन वर्षांपूर्वी याच्या बिया रुजून चांगली दहा- बारा रोपं तयार झाली होती. नंतर कितीतरी दिवस ती मला ओळखताच येत नव्हती. पानाच्या देठांवरील लवमुळे ओळख पटली.

याच कुळातील बुद्धाज कोकोनट (Pterygota alata) ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने लावलेले आहेत. उंचच उंच सरळसोट खोड, मोठाली ह्रदयाकृती पानं आणि नारळासारखी फळं असलेले. हेसुद्धा आत्ता फुलायला लागलेत. जंगलात आढळणारी कौशी (Firmiana colorata) हीसुद्धा यांचीच बहिण. कौशी मात्र अजून फुलायचीय. असं एका वृक्षाचं सबंध कुळ शोधायला आणि त्यांचा सर्वांचा अभ्यास करायला फार मजा येते.

सध्या रानात करवंदीच्या जाळ्या फुलल्यात. त्यांचा गोड वास भरून राहिलाय. कोपिनेश्वरच्या बाजारात हिरवी करवंद, ओले काजूगर मिळायला लागलेत. येऊरला सुरंगी फुललीये. क्वचित येऊरच्या बायका सुरांगीचे नाजूक गजरे घेऊन खाली शास्त्री नगरच्या बाजारात विकायला येतायत. आणि हे कमी म्हणून शहरात पारिजातक, कुंती आणि अनंत बहरू लागलेत. हिवाळ्याच्या शेवटी मी अशी गंधदंग आहे.

65 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page