top of page
Search
Writer's pictureSeema Hardikar

हरित ठाणे

येऊरचं जंगल सध्या अगदीच रखरखीत झालंय. सकाळी सात वाजल्यापासूनच ऊन लागायला सुरुवात होते. गेल्या आठवड्यात येऊर गावाच्या मागच्या डोंगरावर गेलो होतो, तेव्हा डोंगर अगदीच उघडा-बोडका भासला. इथे देवसावर, काटेसावर, साग यांची झाडं बरीच आहेत, त्यातल्या कशावरच आत्ता पानं नाहीयेत. पण तेवढंच कारण नव्हतं. गेल्या वेळेपेक्षा मला काहीतरी वेगळं वाटत होतं. आणि वाट शोधताना क्षणात माझ्या लक्षात आलं कि, पायवाट सोडून बाकी सगळा भाग जाळलेला आहे. संपूर्ण डोंगरउतारावर काळा रंग दिसत होता. छोटी झुडूपं, वाळलेलं गवत सगळं जळून गेलं होतं. झाडांना अजून पालवी फुटली नसल्याने फक्त खराटे उरले होते. आणि म्हणून मला आज जंगल जास्त रखरखीत भासत होतं. पूर्वेकडचं ऊन पाठीवर घेत आम्ही डोंगराच्या मागच्या बाजूला गेलो, तेव्हा कुठे डोंगराचीच सावली मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. थोड्याच वेळात इथेही ऊन येणारच होतं. राखी धनेश, कोतवाल, सुभग, सुतारपक्षी; आज पक्षी अगदी सहज दिसत होते, कारण झाडांवर पानंच नव्हती. समोरच्या डोंगरउतारावर दोन छोट्या काळ्या- करड्या आकृत्या पळताना दिसल्या. मुंगुसांची जोडी होती. अगदी छान पाहायला मिळाली. रान जाळल्यामुळे लपायला त्यांना केवळ दगडांचाच आसरा होता. याच्या थोडे दिवस आधी मानपाड्याच्या बाजूने डोंगरावर गेलो होतो, तिथेही असंच. संपूर्ण डोंगरउतार जाळलेला. या वर्षी या जंगलात फारच जास्त प्रमाणात आगी लागण्याचे प्रकार घडले.

शहरात सुद्धा जमिनीवर साठलेला पालापाचोळा जाळण्याकडेच आपला कल असतो. उघड्यावर पालापाचोळा जाळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. तसेच महापालिकेच्या नियमांप्रमाणे उघड्यावर कचरा जाळायला परवानगीही नाही. परंतु, बऱ्याचदा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आणि त्याच्या परिणामांची कल्पना नसल्याने बागेतील कचरा जाळला जातो. काही प्रमाणात तो कुजवून किंवा नैसर्गिकरित्या कुजून त्याचे कंपोस्ट तयार केले जाते. परंतु, गेल्या आठवड्यात प्रियदर्शिनी कर्वेंच्या व्याख्यानात त्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपोस्टची प्रक्रिया हि हवामान बदल आणि तापमानवाढीत भरच घालते. त्यापेक्षा पालापाचोळा, काडीकचरा यांचे नियंत्रित ज्वलन करून त्यापासून सेमी-अॅक्टीव्हेटेड कोळसा किंवा बायोचार तयार करणे हे जास्त फायद्याचे आहे. हा कोळसा नंतर आपण इंधन, खत किंवा डीओडरायझर म्हणून वापरू शकतो. अशा प्रकारचा कोळसा तयार करण्यासाठी त्यांनी गॅसीफिकेशन तत्वावर चालणारी छोटी भट्टी तयार केली आहे. शहरात तयार होणाऱ्या बागेतील सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीकरिता हि फारच उपयुक्त योजना आहे. त्यातून आपण त्याच्या ज्वलनातून बाहेर पडणारा तीस टक्के कार्बन डायऑक्साईड हवेत जाण्यापासून वाचवू शकतो. शहरातील सफाई कामगारांच्या गटाला यामुळे उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. पुण्यात असे काही गट आज कार्यरत आहेत.

सध्या सीड कलेक्शनचा हंगाम चालू आहे. शहरातले पुष्कळ गट जंगलात जाऊन झाडांच्या बिया गोळा करण्याचं काम करतायत. पाऊस सुरु झाला, हवेतला दमटपणा वाढला, कि या बिया रुजवायच्या. आठ-दहा-पंधरा दिवसांनी त्यांतून इवले इवले अंकुर बाहेर पडतात, दिवसागणिक भराभर वाढतात, त्यांची निरीक्षणे करायची. पावसाळ्याअखेर छोटी रोपे मोठ्या पिशवीत लावून पुढे दोन-तीन वर्षे आपल्या घरी वाढवायची आणि मग ती साधारण पाच-सहा फूट उंचीची झाली, कि वृक्षारोपण मोहिमेत जमिनीत लावायला द्यायची. या रोपांचं असं बाळंतपण करणारे अनेक जण, गट शहरात आहेत. आमच्या वनस्पतीशास्त्र अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी आपापल्या घरी असलेल्या जागेत अशी पंधरा-वीस-पंचवीस रोपं दर वर्षी तयार करतात. यात देशी वृक्ष-वेलींची रोपे तयार करण्यावर भर असतो. मग इतरांशी या रोपांची देवाण-घेवाण होते. माझ्याकडच्या बकुळीच्या बदल्यात तुझ्याकडच्या बहाव्याचं रोप दिलं- घेतलं जातं. ते काळजीपूर्वक आपल्या बंगल्याच्या- सोसायटीच्या आवारात लावलं जातं, जोपासलं जातं. दर वर्षी अशी हिरवी नाती तयार होत जातात. काही वेळा यातली रोपं हरियालीसारख्या संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेकरिता दिली जातात, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कधी तुमच्याकडून हि रोपं त्याला- तुम्हांला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करून घेऊन जातात. आणि अशा घटनांनी आपली छोटीसी आशा तगून राहते, कि ठाण्याचं भविष्य खरंच ‘हरित’ आहे.



98 views1 comment

Recent Posts

See All

1 commento


rahulb.s.13
04 mar 2020

आपका लेख वास्तव में अच्छा है! यदि आपको थन में अपने बगीचे के लिए पौधों और पेड़ों को स्थानांतरित करने में किसी भी मदद की ज़रूरत है, तो हम आपकी मदद कर सकते हैं! हम वास्तव में अच्छी तरह से आपके आइटम पैक और परिवहन करते हैं! https://www.assureshift.in/packers-and-movers-thane

Mi piace
bottom of page