top of page
Search
Writer's pictureSeema Hardikar

फुला-फळांची वाट

Updated: Jun 11, 2019



येऊरमधील पाटोणपाड्याच्या शेवटच्या बसस्टॉपपासून उजवीकडे जी वाट पाड्याकडे जाते ती या दिवसांत विशेष बहरलेली असते. फेब्रुवारी- मार्च महिन्यात आमचा एक तरी वृक्ष परिचय कार्यक्रम इथे ठरलेलाच. सुरुवातीलाच बसस्टॉपवरील टपरीच्या वर आपल्याला पांढरट खोडाचा उंचच उंच असा अंबाडा भेटतो. आत्ता याला फळं लागलेली आहेत. खालीही अनेक पडलेली दिसतील. भाजी-आमटीत याची फळे आंबटाण म्हणून घालतात. या अंबाड्याच्याच खाली आंबा मोहोरलाय. आंब्याची पाने तुम्हांला सहज ओळखता येतील. एकाच कुळातले हे दोन्ही वृक्षोत्तम.

आता उजवीकडच्या रस्त्याने चालायला लागलं कि पहिला भेटतो तो पांढरा चाफा किंवा खुरचाफा. आपल्या देवळांच्या कडेला आवर्जून लावला गेलेला आणि त्यामुळे अगदी आपलाच झालेला असा हा देवचाफा. पण हा मुळचा दक्षिण अमेरिकेतला. लहानपणी याच्या पाकळ्या मागे वळवून देठात खोचून आम्ही अंगठी बनवत असू. आमचा काका रामनवमीला या फुलांचे भरगच्च हार करून भास्कर कॉलनीतल्या रामाच्या मंदिरात नेऊन द्यायचा. कित्येक वर्षे त्याचा हा नेम चुकला नाही.

थोडं पुढे मोईवरील सुकलेली फुलं दिसतील. मोईचं खोड ओळखायची खुण म्हणजे त्याच्या पांढऱ्या खोडावर काळपट रंगाच्या कपच्यांसारखी साल असते. शेजारीच कुंकूचं झाड फुललंय. कुंकू मध्ये नर आणि मादी फुलं वेगवेगळ्या झाडांवर येतात. उजवीकडे कळ्या कुड्याच्या जोडशेंगा पाहायला विसरू नका हं. वावळला हिरव्या पापड्या लागल्या आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात हा पोपटी रंग इतका खुलून दिसतो. त्याच्याच पुढे दोन काकडची झाडं फुलली आहेत. हि फुलं मात्र दुर्बिणीने बघितली पाहिजेत. पांढरट- पिवळी घटाच्या आकाराची नाजूक फुलं असतात. त्याच्या पुढेच कुंकुच्या झाडाला फळं लागली आहेत. लाल- शेंदरी पावडर अंगावर वागवणारी हि मण्यांसारखी फुलं. या पावडरपासूनच पूर्वी कुंकू बनवत असत. या झाडाचं पान उलट करून भिंगाने पाहिलंत तर शिरांच्या मध्ये असंख्य गडद लाल मातकट रंगाचे ठिपके दिसतात. ही कुंकूचं झाड ओळखण्याची खुण. गेल्या वर्षी राजाजी- कॉर्बेटमध्ये भटकंती करताना हि झाडं मोठ्या प्रमाणावर दिसली. तेव्हा कळलं कि याची पानं आणि शेंडे हे हत्तींचं अगदी लाडकं खाद्य आहे. त्यामुळे तेथील जंगलात कुंकूचे उंच वृक्ष आढळत नाहीत.


थोडं पुढे उजवीकडे भिंतीच्या पलीकडे काटेसावर फुललीय. साळुंक्या किचाट करत त्यातला मधुरस पितायत. डावीकडे एक भला थोरला वेल पसरलाय. हा आहे पिळूक. मंजिऱ्यांसारखी फुलं असलेला. खूप सुंदर दिसतो तो फुलं असताना. उजवीकडच्या गल्लीच्या तोंडाशी खरवतचं झाड होतं. कंपाउंड नवीन करताना ते तोडलेलं दिसतंय. आता रस्ता पाटोणपाड्यात शिरतो. गावात शेवग्याच्या झाडासमोर रिठा आहे. आत्ता त्यावर रीठ्यांचे घोस लागलेत. आजी याला रिंगे म्हणते. माझ्या आजोळी कोकणात परसात या रिंगीचं झाड आहे. उन्हाळ्यात सुकून खाली पडलेली हि फळं आजी पोत्याने गोळा करून ठेवते. आईच्या लहानपणी अंग, केस, कपडे धुण्यासाठी रीठेच वापरायची पद्धत होती. सगळंच बदललं.

थोडं पुढे डावीकडे दिव्याच्या खांबाजवळ भलाथोरला वारस फुललाय. पांढरी फनेलच्या आकाराची घोसाने येणारी फुलं. लगेचच आंब्यासारखा मोहोर असलेलं पुढचं झाड दिसेल. यावर पानं नाहीत. हि आहेत अंबाड्याची फुलं. पुढचाच पळसही फुलायला लागलाय. त्याचबरोबर चांदाडाहि. गोल पानांमुळे हा चांदवा किंवा चांदाडा. याची पानं पत्रावळीसारखी वाढून घ्यायला वापरतात. आत्ताही माझ्या समोर तिथल्या एका बाईने ५-६ पानं खुडून नेली. विचारलं तर म्हणाली बोरं बांधायची आहेत म्हणून.


या रस्त्यावर आता दर आठवड्याला यायला हवं. म्हणजे सगळी फुलं, फळं, नवीन पालवी येताना पाहायला मिळेल. मोई, काकड, अंबाडा, वारस, कंकू, काळा कुडा, वावळ हि एरवी शहरात न दिसणारी आपल्याकडची अस्सल देशी झाडं. पानगळी प्रकारातली. त्यामुळे या ऋतूत त्यांना ओळखायचं तर फुलं किंवा खोडावरून. त्यात अंबाडा, काकड, मोई यांचे फुलोरे सारखेच दिसतात. त्यामुळे हे ओळखणं सोपं नाही. त्यासाठी अभ्यास हवा. वारंवार जाऊन बघायला हवं. आमच्या वनस्पती अभ्यासक्रमाच्या लोकांसाठी हि फळा-फुलांनी भरलेली वाट म्हणजे स्वर्गच आहे जणू.

173 views0 comments

Recent Posts

See All

コメント


bottom of page