Search
  • Seema Hardikar

बी ऑर्किड, बहावा आणि पानकुसुम

Updated: May 27, 2019मे महिना उन्हाळ्याचा शेवटचा महिना. आपण सगळे आता वळीवाच्या पावसाची वाट पाहतोय. उकाडा असह्य झाला, कि एखाद दिवस मळभ दाटून येतं आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळतात. धुळीने भरलेला सारा आसमंत तेवढ्या ओलाव्याने पुन्हा तजेलदार दिसू लागतो. ओल्या मातीचा पहिला गंध दरवळतो. मे महिन्यातील हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. मागच्या महिन्यात कोल्हापूरजवळील राधानगरी आणि दाजीपूरच्या जंगलात गेलो होतो, तिथे अगदी एप्रिलच्या मध्यावरच हा पहिला पाऊस आम्हाला अनुभवायला मिळाला. असे टपोरे थेंब. वातावरण लगेच बदलून गेलं. दुसऱ्या दिवशी दाजीपूरचं जंगल अधिकच हिरवंगार भासलं. आपल्याला जसं या वळवाच्या पावसाने ऋतूबदलाची चाहूल लागते, तसा वनस्पतींनासुद्धा हा बदल कळतो. लिली कुळातल्या काही कंदवर्गीय वनस्पती खास या पहिल्या पावसानंतर फुलतात. आपल्याकडे हा बदल अजून व्हायचाय. पण गेल्या आठवड्यात कोयनेच्या जंगलात पॅनक्रॅशियम ट्रायफ्लोरम हि दुर्मिळ वनस्पती फुललेली आढळली आणि या ऋतूबदलाची जाणीव झाली. कोयनेच्या परिसरात अजून पाऊसही झाला नाहीये, परंतु नुसतं दाटून येणारं मळभसुद्धा हिला फुलायला पुरेसं असतं. आपल्याकडे येऊरच्या जंगलात हि वनस्पती आहे. पण तिला फुललेलं पाहणं म्हणजे अगदी दुर्मिळ योगच. ईद का चांद जणू. मळभ दाटून यायला लागलं, कि रोज जंगलातल्या वाटेवर जाऊन यायला हवं, कारण हि कधी फुलेल याचा नेम नाही. आणि एकदा फुलली कि हिचा बहर त्या आठवड्यापुरता. मग जी ती गायब होते, ते थेट पाऊस लागला कि पानं येतात. आणि मग २- ३ महिन्यात तीही गायब. पुन्हा वर्षभर हीचं नामोनिशाण राहत नाही. असं हे पानकुसुम या वर्षी येऊरला फुललं, तर इथे त्याची वर्दी देईनच. तोपर्यंत आपण जरा इतर झाडांकडे वळूया.

उकाडा वाढला की आपल्याकडे नंबर लागतो तो बहाव्याचा. एरवी फारसं लक्षात न येणारं हे तसं मध्यम उंचीचं, वेडंवाकडं झाड. पण एप्रिल उजाडला कि उरलीसुरली पानंही गळून पडतात आणि पिवळसर तपकिरी फांद्यांवर टपोऱ्या हिरवट-पिवळ्या रंगाच्या कळ्यांचे घोस लटकू लागतात. आणि मग वरपासून खालपर्यंत या फुटभर लांबीच्या फुलांच्या माळा फुलायला लागतात. एकेक फुल म्हणजे सौंदर्याचा नमुनाच जणू. पाच गोल लिंबकांती पाकळ्या, मध्यभागी दहा वेगवेगळ्या उंचीचे, वळलेले पुंकेसर आणि एकच हिरवट, लांब वळलेला स्त्रीकेसर. ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर आणि हिरानंदानी इस्टेटमधील पब्लिक गार्डनमध्ये बहाव्यांचा अॅव्हेन्यू आहे. हे एका रांगेतले बहावे फुललेले पाहायला या दिवसांत खास तिकडे चक्कर मारायला हवी. हा आपल्याकडचा अस्सल देशी वृक्ष. विशेषतः पानझडी जंगलात आत्ताच्या मोसमात बाकी सगळं निष्पर्ण, रखरखीत असताना मधेच बहाव्याचा नखशिखांत बहरलेला वृक्ष पहिला, कि डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं. फुलांपाठोपाठ याच्यावर कोवळी लवलवती पोपटी पालवी येते. गेल्या वर्षीच्या लांब नळीसारख्या दिसणाऱ्या कॉफीच्या रंगाच्या शेंगा या रंगसंगतीत अजूनच भर घालतात. रस्त्याच्या कडेने, उद्यानांत आणि इमारतींच्या आवारात लावण्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट वृक्ष आहे.

शहरात तुरळक ठिकाणी गुलमोहोरसुद्धा फुलायला लागलेत. गुलमोहोराचा खरा बहर पावसाच्या सुरुवातीला सुरु होतो. दाटून आलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर लाल-तांबडा फुललेला गुलमोहोर काय दिसतो. आपल्याकडच्या ऑर्किड्सच्या फुलण्याचा हंगामही एप्रिल महिन्यातच सुरु होतो. सध्या येऊरला बी ऑर्किड फुललंय. याची फुलं नावाप्रमाणेच एखाद्या माशीच्या आकाराची. मिमिक्री करणारी. विलक्षण सुंदर. लांबच्या लांब देठावर अनेक फुलं उमललेली. वाऱ्याबरोबर ती हलतात आणि त्या उडणाऱ्या माश्या आहेत असं समजून इतर माश्या त्यांच्याकडे आकर्षित होऊन फुलांचं परागीभवन होतं. उत्क्रांतीच्या टप्प्यात हि फुलं आणि कीटक एकमेकांबरोबर उत्क्रांत होत गेले. त्यांचं परस्परांवर कुरघोडी करणारं वागणं पाहून अचंबित व्हायला होतं. एरवी आंब्याच्या झाडावर असलेली ही ऑर्किड्स तशी दुर्लक्षितच. पण एप्रिल उजाडला कि ती लक्ष वेधून घेतात. खाजगी आवारातील आंब्याच्या झाडांवर असलेली ही ऑर्किड्स हा आपला अमुल्य ठेवा आहे. तो जपायला, वाढवायला हवा.

46 views

©2019 by Foundation for Educational Rendezvous with Nature.