Search
  • Seema Hardikar

बगिच्यातील निसर्गोत्सव

Updated: May 26, 2019

अजून थंडी चांगलीच पडते आहे. संध्याकाळी आणि पहाटे चालायला बाहेर पडलं कि शाल किंवा जॅकेट बरोबर घ्यावसं वाटतंय. तलावपाळी, कचराळी किंवा शहरातल्या रस्त्याकडेला अजून एक सावर आता फुलायला लागली आहे. हि आहे पांढरी सावर किंवा कापोक सावर (Ceiba pentandra). मात्र हि तुम्हांला शहरातच पाहायला मिळेल. आपल्याकडच्या जंगलात नाही. कारण हि मूळची आहे दक्षिण अमेरिकेतली. सरळसोट हिरवट तपकिरी खोड, आडव्या गोलाकार छत्रीसारख्या पसरणाऱ्या फांद्या आणि पंजाच्या आकाराची पाने या हिच्या ओळखण्याच्या खुणा. आत्ताच्या ऋतूत पानगळ होते आणि फांद्यांच्या टोकाला उलटे लटकणारे फुलांचे गुच्छ लागतात. पाच पांढऱ्या- गुलबट पाकळ्यांची ही जास्वंदीच्या कुळातली फुलं. मध्यभागी पाच पुंकेसरांचा गुच्छ, म्हणून नाव pentandra. रात्रीच्या वेळी या झाडावर वटवाघळांचा धुमाकूळ असतो. वाघळं या रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या फुलांमधील मधुरस प्यायला येतात आणि या फुलांचं परागीभवन होतं. रात्री झाडाखाली उभं राहिलं तर वरून फुलं आणि माधुरसाचे थेंब अंगावर पडतात.

अजून एक खूप सुंदर आणि आपल्या जंगलात आणि शहरातही आढळणारा आत्ता फुललेला वृक्ष आहे बकुळ. बकुळीची फुलं वेचून गंध घेण्याचा मोह न होणारा माणूस विरळाच. बरं या फुलांचा गंध सुकल्यानंतरही न मावळणारा. त्यामुळे फुलं वेचून दोऱ्यात ओवून बकुळीच्या माळा घरात, कपाटात, उशाशी ठेवल्या कि अहाहा. बकुळीची पिकलेली फळे म्हणजे बकुळं किंवा ओवळंसुद्धा खायला मस्त लागतात. केशरी-लाल रंगाची, थोडीशी अगोड, पिठूस. जंगलात बकुळीचे प्रचंड मोठे वृक्ष असतात. परंतु शहरात मात्र एवढे मोठे वृक्ष विरळ आहेत. आपल्या सोसायटीच्या आवारात, उद्यानात, रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी हा अगदी उत्कृष्ट पर्याय आहे. दापोलीच्या कृषी विद्यापीठात कॉलेजला जायच्या रस्त्याच्या दुतर्फा बकुळ आणि सुरंगीच्या वृक्षांची रांग आहे. मी तिथे शिकत असताना या दिवसांत सकाळी सकाळी लेक्चरला जाताना जो काही गंध आसमंतात असायचा त्याला तोड नाही. लॅबॉरेटरीतल्या काकांकडून दोरा मिळवून या फुलांच्या माळा करण्यात इतका छान वेळ जायचा. तसा avenue नंतर कुठेच पहिला नाही. माझे कॉलेजचे दिवस असे मंतरलेले होते.

आज खूप दिवसांनी सकाळी कोपरी पुलाजवळच्या दत्ताजी साळवी निसर्ग उद्यानात गेले होते. आमच्या वनस्पती परीचय अभ्यासक्रमातल्या लोकांचं हे अगदी लाडकं ठिकाण. विशेषतः शशी आजोबा आणि त्यांचा कंपू इथे रोज सकाळी भेटणारच. आणि मग बागेत आत्ता काय फुललंय याची इथंभूत माहिती ते ग्रुपवर टाकणार. हि बाग ठाणे महानगरपालिकेची असली तरी ते याला बाळ्याची बाग म्हणूनच ओळखणार. आणि हे बाळ्या म्हणजे विजय पाटील. या बागेचे सर्वेसर्वा. हिरवी स्वप्नं पाहणारा हा वेडा माणूस. आपल्या आवडीमुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे अगदी देशात- जगात वेगवेगळ्या कोपऱ्यात आढळणाऱ्या अनेक जातीच्या वनस्पतींचा संग्रह इथे आहे. या एवढ्याशा जागेत इतकी विविधता पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. इथे बहावा, तामण, रोहीतक, सीता अशोक, रतनगुंज, उंडी, सुरंगी, रुद्राक्ष, वारस, टेटू, खिरणी, सोनसावर, सीतारंजन, मुचकुंद, चुक्रासिया, अर्जुन यांसारखे अगदी अस्सल देशी वृक्ष आहेत. डिकेमाली, शतावरी, वेलगुंज, रिठा, मुरुडशेंग, अडुळसा, इ. सारख्या औषधी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पाम, बांबू, नेचे, पाणवनस्पती, कॅक्टाय आणि सकुलंट इथे आहेत. शाळा, कॉलेजची मुले, आणि निसर्ग अभ्यासकांसाठी हि बाग म्हणजे नंदनवनच आहे. अगदी छोट्या जागेवर वसलेलं हे बॉटॅनिकल गार्डन आहे असं म्हणायला हरकत नाही.

जसं जंगलात दर वेळी गेलं कि नवीन वाटतं तसं इथल्या विविधतेमुळे इथेही दर आठवड्याला गेलात तर तुम्हांला नवीन काही फुललेलं दिसेल. अनेक प्रकारच्या गार्डन आणि हॉर्टीकल्चर व्हरायटीजमुळे या बागेला सौंदर्याचाही एक अनोखा पैलू आहे. वनस्पतींच्या वैविध्यामुळे फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचेही अस्तित्व इथे आहे. शहराच्या गजबजाटात इथला निसर्गोत्सव दर दिवशी आपल्याला रिझवतो, शांत करतो. मात्र याचं श्रेय त्या विजय नावाच्या ‘बाघबान’ ला आहे.


37 views1 comment

©2019 by Foundation for Educational Rendezvous with Nature.