top of page
Search
  • Writer's pictureSeema Hardikar

आनंदयात्रायेऊरच्या फाटकातून आत गेलं कि उजवीकडच्याच झाडावर पसरलेल्या पिळूकची फुलं आपल्या नजरेत भरतात. आता तर गुलाबी-तांबूस रंगाची चौफुल्यासारखी फळंही लागली आहेत. उक्शीच्या फुलांनी तर जणू सगळं जंगलच व्यापून टाकलंय. एका झाडावरून दुसऱ्यावर पसरत हि वेल जणू काही सगळ्या जंगलावर पांघरूण घालून बसली आहे, असं वाटतं. पण काही म्हणा, उक्शीची भिंगरीसारखी पाच पंख असलेली फुलं- फळं वाऱ्यावर भिरभिरत खाली येताना दिसली, कि आपणच जणू हलके होऊन तरंगत खाली येत आहोत असं वाटतं. सावरीच्या कापसाची पण तीच तऱ्हा. आता जंगलात काटेसावरीची बोंडं उकलून त्यातून मऊ मुलायम कापूस बाहेर पडतोय. याच्या मुलायम स्पर्शाची जातकुळीच वेगळी. ती अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

वळणावळणांच्या रस्त्याने आपण पुढे जातो. भोकराच्या झाडावर नाजूक पांढरी फुले आहेत. मधूनच मोगऱ्यासारखा सुगंध येतो, हीच ती बारतोंडी. जंगलात या सुगंधाने वेड लागतं. बोटाच्या पेराएवढं पांढरं पाच पाकळ्यांचं फुल. पण सुगंध इतका अप्रतीम. हुंबवर आता हिरव्या मण्यांसारख्या फळांचे घोस लटकतायत. उजवीकडच्या वळणावर भलीमोठी अस्ताव्यस्त वाढलेली खिरणीची दोन झाडं आहेत. चिवट, गडद हिरव्या रंगाची हिची पानं. आपल्या चिकू, बकुळीची हि बहिण. चिकूची कलमं करताना खिरणीचा रूटस्टॉक वापरतात. या खिरणीशेजारीच सुरंगी बहरलीये. जवळ जाऊन पाहिल्याशिवाय हिच्या खोडावरची नाजूक फुलं दिसणं कठीणच. याच झाडांवर कुसरीची वेल फुललीये. हिरव्या पानांवर कुसरीची नाजूक पांढरी फुलं म्हणजे एखाद्या कुशल विणकराने केलेली कलाकुसरच जणू.

लगेचच डावीकडे शिवण फुललीये. हिच्या नाजूक पिवळ्या- केशरी मुडपलेल्या पाकळ्यांचं सौंदर्य इतकं जीवघेणं असतं, कि हिच्या प्रेमात तुम्ही न पडाल तरच नवल. गोल हृदयाकृती पानं आणि पिवळसर खोडाच्या शिवणीचा पसारा आटोपशीर असतो. आता इथून मोहाची झाडं सुरु होतात. जणू काही आपण एखाद्या अद्भुत प्रदेशात प्रवेश करतोय. काही मोहांवर फुलं, काही ठिकाणी फळं तर काहींवर लाल-किरमिजी रंगाच्या कोवळ्या पालवीचा साज चढलाय. खऱ्या अर्थाने हे झाड आपल्याला मोहात पाडतं. गेल्या आठवड्यात नाशिकजवळ हरसूलच्या जंगलात गेले असताना तिथे याची टपोरी फुलं गोळा करणारे आदिवासी भेटले. जंगलातच थोडी जागा साफसूफ करून हि मोहाची फुलं वाळत घातली होती. आपण वाळवणं घालतो तशी. हि सुकवून नंतर तिथल्या बाजारात विकतात. मन भरून फुलं खाल्ली. मोहाच्या फुलांच्या दारूचं नाही सांगता येणार, पण या फुलांची जादू मात्र खूप काळ मनावरून उतरत नाही.

काळ्या कुड्याला नुकताच बहर येऊ घातलाय. हे झाड संपूर्ण निष्पर्ण. काही ठिकाणी गेल्या वर्षीच्या जोड-शेंगा उकलून त्यातून कापसासारखे पंख असलेल्या काटकीसारख्या बिया बाहेर पडतायत. हे दृश्य अतिशय सुंदर दिसतं. याची फुलं फारच देखणी, पाच पांढऱ्या पाकळ्या आणि त्यांवर त्याच रंगाची झालर असणारी. आपण लेसची फुलं बनवतो तशी. संपूर्ण बहरल्यावर हि नाजूक चांदण्यांसारखी फुलं म्हणजे सौम्य शीतल सौंदर्याचा नमुनाच जणू.

अजून एक खास झाड आपण पाहणार आहोत, ते आहे कौशीचं. हेही निष्पर्ण. हिची फुलं जंगलात लांबवर कोणीतरी कुंकवाचा शिडकावा केल्यासारखी. जवळ जाऊन खाली पडलेलं फुल पाहिलंत तर तुम्हांला त्याचं खरं सौंदर्य कळेल. बोटाच्या पेराएवढी लांब केशरी पुंगळी. बाहेरून केशरी रंगाची मखमल, तर आतून गुलाबी. पाच पाकळ्या टोकाकडे सुट्या आणि या पुंगळीतून बाहेर डोकावणारी एक नलिका. कौशीचा रंग हा पळस किंवा पांगाऱ्यासारखा भडक मुळीच नव्हे, तर केशरी असूनही या फुलांचे गुच्छ अतिशय सौम्य दिसतात. कौशीचं सौंदर्य पाहायला तुम्हांला रस्त्यावरून थोडं खाली उतरावं लागेल. तर पांगारा मात्र अगदी सहज तुम्हांला रस्त्याने जाताजाताही दिसेल. अजून याच्यावर भडक केशरी-लाल रंगाचे फुलांचे पंखे फुललेले आहेत. काही ठिकाणी पांढरट हिरव्या रंगाच्या शेंगा लटकताना दिसतील.

काही वळणं चढून आता आपण वर पोचतो. आणि गावाच्या थोडं आधी आपलं स्वागत करतो कुंभा. याच्या पांढऱ्या, अनंत पुंकेसरांनी जणू हसणाऱ्या, सुगंधी फुलांना पाहून आपलं मन तृप्त होतं. आपली आनंदयात्रा सुफळ संपूर्ण होते.

90 views0 comments

Recent Posts

See All

Commentaires


bottom of page