
गेले सात दिवस उत्तर कर्नाटकातल्या शिरसीजवळील नागरकोडीला राहण्याचा योग आला. हे गाव अघनाशिनी या नदीच्या किनारी वसलेलं आहे. संकटांचा नाश करणारी अशी हि अघनाशिनी. इथल्या विस्तीर्ण सुपारीच्या बागा, त्यांतील माड, मिरवेली, केळी, कॉफी यांना पोसणारी अशी हि जीवनदायिनी. उन्हाळ्यातही इथे पिकलेलं भात डोलतंय. या आठवड्यात कापणी होईल. अघनाशिनी उगम पावते शिरसीच्या वर मंजगुणी या ठिकाणी. आणि तिथून शिरसीमधून ती नागरकोडीला वाहत येते. इथून पुढे उंचल्ली या ठिकाणी मोठ्या धबधब्याच्या रूपाने खाली झेपावत पुढे कुमठ्याजवळ अरबी समुद्राला मिळते. अघनाशिनीवर एकही मोठे धरण नाही. काही ठिकाणी छोटे बांध आहेत. पण तिचा प्रवाह हा सतत खळाळत वाहणारा आहे. आत्ताच्या काळात हे दृश्य फारच दुर्लभ. नदीचे काठ संपूर्ण नैसर्गिक आहेत. यांतील बराचसा प्रदेश जंगलाने व्यापलेला आहे. नदीच्या काठावर बांबू, केवड्याची बने आहेत, तामण, होपिया यांसारखे वृक्ष आहेत, पात्रात विस्तीर्ण क्रायनमची बेटं आहेत, दोन्ही किनाऱ्यांवर वाळू आहे, मोठमोठाले दगड आहेत, खळगे आहेत, छोटे- मोठे धबधबे आहेत, गुळगुळीत गोटे आहेत, गवताची बेटं आहेत. अशी अत्यंत समृध्द अशी परिसंस्था पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. याचबरोबर अतिशय निसर्गस्नेही अशी इथली संस्कृती आपल्याला मोहात पाडते. इथल्या देवराया, मायरिस्टीका स्वॅम्पसारख्या दुर्मिळ परिसंस्था अतिशय मोलाच्या आहेत. विकासाच्या मागे धावत असलेले आपण आणि शाश्वत, साधं आयुष्य जगणारे इथले लोक यांची तुलना आपल्या मनात सहजच होते. आणि मग लक्षात येतं कि आपण काय मिस करतोय.. नदीचा स्वच्छ खळाळता वाहता प्रवाह, सकाळ संध्याकाळ त्यात डुंबण्याचा मनमुराद आनंद, शामा, मलबार व्हिसलिंग थ्रश, ऑरेंज हेडेड थ्रश, पफ थ्रोटेड बॅबलर यांची गाणी, मोर आणि जंगली कोंबड्यांचे आवाज, रात्रीच्या वेळी सुपारीच्या बागेत दिसणाऱ्या फ्लायिंग स्क्विरेल्स, इथली शांतता, रात्री नदीकाठच्या वाळूतून दिसणारं अफाट तारकांनी भरलेलं आकाश आणि त्याच बरोबर खाली काजव्यांनी भरलेली झाडं. खरोखर स्वर्गीय अशा आनंदात हे दिवस गेले. ती नशा अजून उतरली नाहीये..
Comments