Search
  • Seema Hardikar

आपले वृक्षआपल्याकडे एकूणच निळी छटा असणारी फुले कमी. त्यात उन्हाळ्यात फुलणारे बरेच वृक्ष हे पिवळ्या, केशरी, लाल रंगाची फुले असणारे. याला अपवाद शहरात तुरळक आढळणारा जॅकॅरांडा. यालाच काही जण नीलमोहोरसुद्धा म्हणतात. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे Jacaranda mimosifolia. हा वृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेतला. तेथील स्थानिक भाषेतील झॅकरांडा या नावावरून Jacaranda आणि mimosifolia म्हणजे लाजाळूसारखी पाने असलेला. एरवी फुलं नसताना हा वृक्ष अगदी गुलमोहोरासारखा दिसतो. हिवाळ्यात पानगळ होते आणि वसंत ऋतू सुरु होताच नवीन पालवी आणि जांभळ्या फुलांचे तुरे दिसायला लागतात. याचा जांभळा रंग काही वेगळाच. कडक उन्हामध्ये डोळ्यांना सुखद वाटणारा. परंतु पुण्या-बंगलोरसारखे जॅकॅरांडा आपल्या इथे ठाण्या-मुंबईत फुलत नाहीत. त्याला खारी, दमट हवा मानवत नाही. आपल्या इथे झाडांवर तुरळक फुलांचे गुच्छ दिसतात. तर कोरड्या प्रदेशात संपूर्ण झाड निळ्या शिडकाव्याने भरून जातं. झाडाखाली तलम मुलायम निळ्या पाकळ्यांच्या घंटेसारख्या फुलांचा खच पडतो. ठाण्यात लुईसवाडीत सोलंकी अपार्टमेंटच्या बाहेर याचे एक झाड आहे. याच्या फुलांकरिता रस्त्याच्या कडेने किंवा उद्यानात एखाद-दुसरे झाड लावायला हरकत नाही.

निळी-जांभळी फुले येणारा आपल्याकडचा या ऋतूत बहरणारा आणखी वृक्ष म्हणजे तामण किंवा जारुल (Lagerstroemia speciosa). याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून मान आहे. कोकणात नदी-ओढ्यांच्या काठी तामण मोठ्या संख्येने आढळतात. एकूणच भरपूर पाणी असलेली भारी जमीन तामणला मानवते. त्यामुळे आपल्याकडे उद्यानातही सर्वत्र हि झाडे लावलेली आढळतात. तामणचे खोड काहीसे पेरुसारखे. पांढरट गुळगुळीत. आणि पानं लांबट पण टोकेरी असतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती पिवळ्या- लाल रंगाची होतात. मार्च-एप्रिल मध्ये नवीन पालवी येते आणि त्याचबरोबर गुलाबी-जांभळ्या फुलांचे तुरे फांद्यांच्या टोकांवर यायला लागतात. प्रत्येक फुलाला ६ ते ७ क्रेप कागदासारख्या पाकळ्या असतात. आणि मध्यभागी पिवळे पुंकेसर. भर उन्हाळ्यात हि निळी-गुलाबी-जांभळी फुले उठून दिसतात. नजरेला सुखावतात. तामणचा आपल्या जंगलातील अजून एक भाऊ म्हणजे नाणा (L. microcarpa). हा पावसाळ्यात फुलतो. तर बागेत लावला जाणारा L. thorelii हा छोटेखानी वृक्षही पावसातच बहरणारा. राणीच्या बागेत याची अनेक झाडं आहेत. तामणसारखीच लहान पांढरी, गुलाबी, जांभळी फुले येणारी आईसक्रीम फ्लॉवर म्हणून प्रसिद्ध असणारी झुडुपेसुद्धा बागेत छान दिसतात. कोकणात खेडपासून दापोलीकडे जाताना रस्त्यात नदीकाठी या दिवसांत फुललेले तामण पहिले कि डोळ्यांचं पारणं फिटतं. त्याचबरोबर नेवरही फुललेली असते. हिची दीपमाळेसारखी लाल-गुलाबी लटकणारी सुगंधी फुले संध्याकाळी उमलणारी. सकाळी नदीवर गेलात तर झाडाने सगळा पुष्पसंभार पाण्यावर उतरवून ठेवलेला दिसतो. आणि मग आपण भिजत असताना पाण्याबरोबर हलके हलके वाहत येणारी सुगंधी नेवरीची फुलं आपलं स्नान खरोखरच शाही बनवतात.

ठाण्यात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या कडेने सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूने सलग पेल्टोफोरमची (Peltophorum pterocarpum) झाडं लावलेली आहेत. हे झाड मुळचे श्रीलंका-मलाया पट्ट्यातील. परंतु आपल्याकडे शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेने लावले गेलेले. याची पानं गडद हिरवी, चिंचेच्या पानांसारखी. एरवी हे झाड सावलीसाठी चांगले असले तरी तसे अनाकर्षक. पण उन्हाळ्यात याला सोनपिवळ्या फुलांचे गुच्छ यायला लागले कि एकदम नजरेत भरणारे. या फुलांमुळेच याला सोनमोहोर किंवा पिवळा गुलमोहोर असेही म्हणतात. इंग्रजी नाव कॉपर पॉड ट्री हे याच्या लालसर किरमिजी चपट्या शेंगांमुळे पडले आहे. याचाच एक आफ्रिकन भाऊ P. africana तुरळक आढळतो. ठाण्यात एल.आय.सी. कार्यालयाजवळ सर्व्हिस रोडवर याचे एक झाड आहे. हा पावसाळ्यात फुलणारा. कॉपर पॉडच्या कळ्या- फुला- शेंगांवर सर्वत्र तांबूस रंगाची लव आढळते, तर आफ्रिकन पेल्टोफोरमच्या फुलांवर हि लव नसते. सध्या शहरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामध्ये यातील अनेक झाडं तोडली जाणार आहेत. विदेशी वृक्ष म्हणून पेल्टोफोरमबद्दल निसर्ग अभ्यासकांच्या मनात अढी असली तरी कोणतीही झाडं तुटणार म्हटलं कि सर्वांचं मन हळहळतंच. उन्हाळ्यात याच्या खाली अंथरल्या जाणाऱ्या पिवळ्या फुलांच्या गालीचाची आम्हाला नक्की आठवण येईल. जरी फारशी जैवविविधता या वृक्षावर आढळत नसली, तरी एक-दोन शतकांपूर्वी आपल्याकडे आणलेला आणि कौतुकाने लावला गेलेला हा वृक्ष आपला म्हणायला हरकत नाही. कचराळी तलावाजवळ सत्तरपेक्षा जास्त वटवाघळांचे आश्रयस्थान असलेली सहा झाडं पेल्टोफोरमची आहेत, हे याचंच द्योतक नाही का?

324 views1 comment

©2019 by Foundation for Educational Rendezvous with Nature.